उरुळी कांचन, ता. 23 : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, कांचन पार्क सोसायटी परिसरातून एकाच रात्री दोन होंडा युनिकॉर्न मोटारसायकली चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या चोरीत चोरट्यांनी तब्बल 70 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी लंपास केल्या आहेत.

याप्रकरणी भाउसाहेब शिवाजी दळवे (वय 50, रा. कांचन पार्क सोसायटी, उरुळी कांचन) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दळवे यांनी आपली काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न (एमएच 12 एसडी 1723) ही मोटारसायकल शनिवारी (ता. 21) रात्री साडेनऊच्या सुमारास सोसायटीच्या इमारतीबाहेरील मोकळ्या जागेत हँडल लॉक करून उभी केली होती. मात्र, रविवारी (ता. 22) पहाटे सव्वाचारच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने फोन करून काही अज्ञात व्यक्ती दुचाकी ढकलत घेऊन जात असल्याचे सांगितले.

त्यानंतर दळवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांची मोटारसायकल गायब असल्याचे आढळले. अधिक चौकशी केली असता शेजारील इमारतीत राहणारे अनिल बाबासाहेब पोफळे यांची लाल रंगाची होंडा युनिकॉर्न (टीएस 09 एफक्यू 0617) ही मोटारसायकलही चोरीला गेल्याचे समोर आले. एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला गेल्याने सोसायटी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.






