यवत, ता. 23 : नाचगाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी पैसे भरल्यानंतरही कार्यक्रमाच्या खोलीतून बाहेर जाण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यावेळी सासवड येथील वेदांत खटके याच्यासह सात ते आठ जणांनी मजूर पुरवठा ठेकेदारासह त्याच्या मित्राला बेल्ट, लाकडी दांडके, लोखंडी पाईप आणि गाडीच्या वायपरने बेदम मारहाण केल्याची घटना बोरीपार्धी चौफुला परिसरातील रेणुका कला केंद्रात घडली. या प्रकरणी यवत पोलिसांनी वेदांत खटके व त्याच्या सात ते आठ अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकट जगन्नाथ इपर (वय 47, रा. पिंपरी-चिंचवड) हे मजूर पुरवठ्याचा व्यवसाय करतात. 22 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ते बंडू विश्वास धायगुडे आणि खंडेराव भास्कर गोरे यांच्यासोबत रेणुका कला केंद्रात कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमासाठी आठ हजार रुपये भरले होते. कार्यक्रम सुरू असताना त्यांच्या खोलीत सात ते आठ अनोळखी तरुण आले. त्यांनी इपर व त्यांच्या मित्रांना बाहेर जाण्यास सांगितले. यावर बंडू धायगुडे यांनी आम्हीही पैसे भरले असून, आधी आमचा कार्यक्रम होऊ द्या, असे सांगितले. याचा राग आल्याने संबंधितांनी तिघांना शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर खोलीबाहेर आल्यानंतरही आरोपींनी पाठलाग करून बेल्ट, लाकडी दांडके, लोखंडी पाईप आणि गाडीच्या वायपरने इपर व धायगुडे यांना डोक्यावर, मानेवर, पोटात तसेच शरीराच्या संवेदनशील भागांवर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये बंडू धायगुडे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

या मारहाणीत दोघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर यवत ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, झालेल्या झटापटीत इपर यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईलही गहाळ झाला आहे. याप्रकरणी व्यंकट इपर यांच्या फिर्यादीवरून वेदांत खटके व त्याच्या सात ते आठ साथीदारांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गाढवे करीत आहेत.






