कोल्हापूर : कोल्हापुरात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. गोकुळ दूध संघाचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांचे पुत्र पद्मसिंह पाटील यांच्या कारने दोघांना धडक दिल्याची घटना शिवाजी विद्यापीठ परिसरात घडली. या प्रकरणी पद्मसिंह रणजितसिंह पाटील याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश पाथरूड आणि गणेश पाथरूड अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. पद्मसिंह पाटील याच्या कारने दोघांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, अपघातानंतर पद्मसिंह पाटील घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप आहे. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.







