उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेला अनेक दिवस रहावे लागणार असल्याने भाड्याने रुम दाखविण्याचा बहाणा करुन तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर बला-त्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी (ता. ०५) हडपसरमधील जयप्रकाश सोसायटीत दुपारी घडली आहे.
संजय बाजीराव भोसले (वय ५२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी संजय भोसले याला उरुळी कांचन येथून अटक केली आहे. याबाबत गाझीयाबाद येथील एका ३९ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझीयाबाद येथील एक महिला मणक्याचा त्रास असल्याने उरुळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आल्या होत्या. अनेक दिवस उपचार घ्यायचे असल्याने त्यांना राहण्यासाठी भाड्याने रुम पाहिजे होती. त्यांनी संजय भोसले यांच्याकडे विचारणा केली.
दरम्यान, तेव्हा त्याने रुम दाखविण्याचा बहाणा करुन त्यांना जयप्रकाश सोसायटीत नेले. तेथे त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्यावर बला-त्कार केला. ही बाब कोणाला सांगितल्यास बघून घेईन, अशी धमकी दिली.
हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले अधिक तपास करीत आहेत.