पुणे : बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने एका तरुणाने पोलीस ठाण्यातच पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड येथे घडली असून उपचारादरम्यान सदर तरुणाचा मृत्यू झाला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. ०२) रात्री हि घटना घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मृत तरुण हा १९ वर्षीय पीडितेच्या घरी गेला. पीडित तरुणी घरामध्ये एकटी असताना त्याने गैरफायदा घेतला आणि धमकी देत बळजबरीने शरीर संबंध ठेवल्याचा आरोप तरुणीने फिर्यादीत केला. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास आरोपी पुन्हा घरी आला. त्याने तरुणीला माझ्याशी लग्न कर नाहीतर आजपर्यंत तुझ्यावर जेवढे पैसे खर्च केले आहेत ते परत कर असे म्हणत वाद घातला.
पीडित तरुणीने आरोपीला शिक्षण झाल्यावर लग्न करू असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने तरुणीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच तू जर माझ्याशी लग्न केले नाहीतर तुला व तुझ्या भावाला मारून टाकेन, अशी धमकी दिली. याबाबत १ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने त्याने भोसरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी (ता. ०६) त्याचा मृत्यू झाला.