लोणी काळभोर (पुणे) : हडपसर-सासवड मार्गावर वडकी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या पिकअप व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. ०१) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
गौरी अशोक मोहिते (वय ३३, येरवडा, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर नितीन विजय काळकुंडे (रा. येरवडा, पुणे) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पिकअप चालक नवनाथ गुलाब बडदे (वय-४२ रा. कोडित, ता. पुरंदर) यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड मार्गावरून गौरी मोहिते व नितीन काळकुंडे हे त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीवरून सासवडकडे निघाले होते. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास वडकी ग्रामपंचायत हद्दीतील पालखी विसावा या ठिकाणी आले. यावेळी सासवड बाजूकडून पिकअप हे हडपसर या ठिकाणी निघाले होते. पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास पिकअपने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती कि, दुचाकीवरील गौरी मोहिते व नितीन काळकुंडे हे या अपघातात गंभीर जखमी झाले.
दरम्यान, सदर घटनेची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस नाईक महेश भोंगळे आणि पोलीस अंमलदार अभिजित टिळेकर यांनी मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोघांनाही एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र उपचारादरम्यान जखमी गौरी मोहिते यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर करीत आहेत.