पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या कुख्यात गुंड गज्या मारणेला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक क्र. २ ने वाई (जि सातारा) येथून मुसक्या आवळल्या आहेत. यापुर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या अपहरण प्रकरणात चंदगडमधील डॉक्टर डॉनला मध्यप्रदेशातील इंदूर येथून अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड गजानन मारणे याने सांगली व पुण्यात शेअर व्यवसाय करणार्या एका व्यावसायिकाचे वसुलीसाठी अपहरण केले होते. त्याला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यात खंडणी विरोधी पथकाने चौघांना अटक केली आहे.
त्यानंतर या गुन्ह्य व्यावसायिकाचे अपहरण केल्यानंतर तपासात प्रकाश बांदिवडेकर यानेही धमकाविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो इंदूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने इंदूरमधून त्याला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात १४ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. तर प्रकाश बांदिवडेकर हा १५ वा आरोपी आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी कुख्यात गुंड गज्या मारणे फरार होता. त्याला खंडणी विरोधी पथक क्रमांक २ चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाई (जि. सातारा) येथून ताब्यात घेतले आहे. तरी, पुढील तपास पुणे पोलीस करीत आहेत.
हि उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त( गुन्हे -२ ) नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक क्रमांक २ चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.