भोर : शेतीच्या वादातून एका ज्येष्ठ महिलेला विजेच्या खांबावर आकडा टाकून विद्युत शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हिराबाई दत्तात्रय कापरे (वय-५८) असे या महिलेचे नाव आहे. तर विजय निवृत्ती सुर्वे (वय-३८) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सुर्वे यांनी हिराबाई कापरे यांच्या दिराकडून दिड गुंठा जमीन खरेदी केली आहे. मात्र, तेथील जागा आणि विहीर याबाबत वाद सुरू असून त्याचा खटला कोर्टात सुरू आहे. १८ तारखेला विजय सुर्वे याने हिराबाई यांना “तुम्ही मला पाणी दिले नाही तर मी तुला जीवे मारून टाकीन”, अशी धमकी दिली होती. त्यानंतर हिराबाई यांचे पती शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना विजय सुर्वे हा विजेच्या खांबाजवळ काही तरी करत असल्याचं आढळून आला.
मात्र, ते कामात असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर हिराबाई या शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. ज्वारीला पाणी दिल्यानंतर त्यांनी पुढच्या पट्टीत पाऊल टाकले तेव्हा त्यांना विजेचा जोरात झटका बसला. गंजलेली तार इथे कशी आली हे पाहण्यासाठी त्या पुढे गेल्या तर त्यांना विजेच्या खांबावर आकडा टाकलेला दिसला. खांबावरून ती तार ज्वारीच्या शेतापर्यंत आणल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, या घटनेची शहानिशा केल्यानंतर त्यांनी जवळ असलेल्या किकवी पोलीस स्टेशनमध्ये विजय सुर्वे विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याने पहिल्यांदा उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीसी खाक्या दाखवताच हे कृत्य आपणच केल्याचे त्याने कबूल केले. दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.