Amravati Crime : अमरावती : घटस्फोटित महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार अमरावतीमध्ये घडला. २०१८ मध्ये घडलेल्या या घटनेचा ५ वर्षांनी म्हणजेच 2023 ला निकाल लागला आहे. याप्रकरणात आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायालयाने आरोपी संदीप लक्ष्मण परतेकी (वय ३४, रा. कारंजालाड, जि. वाशीम) याला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
अमरावती शहरातील फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत ही घटना ३ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली होती. फ्रेजरपुरा पोलिसांनी ४ डिसेंबर २०१८ रोजी याप्रकरणी संदीप परतेकी विरुद्ध अत्याचार व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अखेर त्याचा निकाल लागला आहे.
पीडित महिला आणि संदीप परतेकी हे दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. घटनेच्या १५ दिवसांपूर्वी पीडिता ही काम करीत असताना संदीपने तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडितेने कामावर जाणे बंद केले होते. तीन डिसेंबरला घटनेच्या दिवशी पीडित महिला घरी असताना संशयित संदीपने तेथे पोहोचून कामावर न येण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांच्यात वादविवाद झाले.
संदीपने नंतर दार बंद करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करून जिवाने मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर दोन तासांनी पीडिता रडत असल्याचे एका महिलेस दिसली. पीडितेने फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक नीलिमा सातव यांनी याप्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने आरोपीस विविध कलमान्वये एकूण पाच हजार रुपयांचा दंडसुद्धा ठोठावला. दंडाची रक्कम न्यायालयात जमा केल्यानंतर ती रक्कम पीडितेस नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.