Ambegaon News पुणे : लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेचे बाळंतपण झाल्यानंतर काही वेळाने तिला उलटी होऊन रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना (ता. ९ जुलै ) २०२३ रोजी घडली आहे. (Ambegaon News)
दरम्यान, बाळंतपण झालेल्या महिलेची तब्येत खालवलेली असताना त्यावेळी रुग्णालयात कुठलाही डॉक्टर, नर्स हजर नसल्याने सदर महिलेचा मृत्यू लांडेवाडी येथील डॉक्टर व नर्स तसेच कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप मयत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. (Ambegaon News) या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. याबाबत मुलीचे वडील शिवाजी दादू लव्हांडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार शिवाजी लव्हांडे (रा. लांडेवाडी ता. आंबेगाव) यांची मुलगी अश्विनी बाळू केसरकर ( वय २८ रा. कासरवाडी ता. शाहूवाडी कोल्हापूर ) ही माहेरी बाळंतपणासाठी आली होती. दिनांक ९ रोजी सकाळी आठ वाजता सरकारी रुग्णालय लांडेवाडी येथे चेकअप साठी नेले होते. त्यावेळी रुग्णालयातील परिचारिका हुले यांनी मुलीला दोनच्या दरम्यान ऍडमिट करून घेऊ असे सांगितले. (Ambegaon News)
त्यानंतर मुलीचे आई वंदना लव्हांडे यांनी दुपारी मुलीला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रुग्णालयात हुले मॅडम परिचारिका, आशा वर्कर गाढवे व मुलीची आई हे तीनच व्यक्ती उपस्थित होत्या. त्यावेळी कुठल्याही प्रकारचे जाणकार डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नव्हते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमरास मुलीचे बाळंतपण झाल्यानंतर तिला दुसऱ्या वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले.
बाळंतपण झालेली खोली मुलीची आईने साफ करणेत थोडा वेळ गेला. त्यानंतर मुलीची आई मुली जवळ गेली असता तिला उलटी होऊन रक्तस्त्राव झाला होता. हे सर्व पाहिल्यानंतर मुलीच्या आईने रुग्णालयात कोणी आहे का याचा शोध घेतला असता तेथे एक कर्मचारी उपस्थित होता. त्या कर्मचारी याने परिचारिकेस फोन करून बोलवले. त्यांनी आल्यानंतर रुग्णाला पाहिले असता त्यांना तात्काळ मंचर येथील रुग्णालयात हलवण्यास सांगितले.
दरम्यान, रुग्णाची परिस्थिती अतिशय खालवली असताना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णाला मंचर येथे नेतानाही रुग्णवाहिकेत कुठल्याही डॉक्टर व नर्स आले नाही. मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्ण महिलेस दाखल केले असताच काही वेळातच तेथील डॉक्टरांनी मुलगी मयत झाली असल्याचे सांगितले.
या सर्व प्रकाराला लांडेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी जबाबदार असून ते जाणकार डॉक्टर रुग्णालयात हजर नसताना मुलीचे बाळंतपण करण्यात आले व त्यानंतर परिचारीका हिने महिलेकडे दुर्लक्ष केल्याने मुलीचा मृत्यू झाला असा आरोप मुलीचे वडील शिवाजी लव्हांडे यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी मयत मुलीच्या कुटुंबीयांनी केले आहे.
यावेळी वेद्यकिय अधिकारी संदिप जाधव यांच्या शी संपर्क साधला असता ते म्हणाले की, संबधीत महिलेची प्रसुती ही नैसर्गीक रित्या झाली आहे.