Ambegaon News : आंबेगाव, (पुणे) : साकोरे – वडगाव रस्त्यावरून दुचाकीवर गावातून मंचर या ठिकाणी कामासाठी निघालेल्या दोन तरुणांच्या अंगावर बंधाऱ्याजवळ असलेला सिमेंटचा पोल पडून झालेल्या अपघातात एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर गाडीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ०८) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
परिसरात हळहळ व्यक्त
विशाल संतोष ढगे (वय- २२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अजित साहेबराव मोंढवे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर मंचर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार, साकोरे – वडगाव रोडवर हा अपघात घडला आहे. साकोरे येथील विशाल ढगे आणि अजित मोंढवे हे दोघे मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात कामाला आहेत. नेहमीप्रमाणे ते त्यांच्या वेळेत घरातून दुचाकी घेऊन कामाला निघाले.
कामावर सकाळी साडेनऊच्या सुमारास ते साकोरे वडगाव रोडने बंधाऱ्याजवळ आले. मात्र त्या ठिकाणी उभा केलेला मोकळा सिमेंट पोल अचानक त्यांच्या दुचाकीवर पडला. तो सिमेंट पोल अंगावर पडल्याने विशाल संतोष ढगे याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर अजित साहेबराव मोंढवे हा यात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. अपघात ज्यावेळी झाला त्यावेळी घटनास्थळी कोणी नव्हते. त्यामुळे अपघातात नेमका कसा झाला. तो खांब कसा पडला हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र. त्या ठिकाणी उभा केलेला पोल कुठलाही आधार न देता उभा केलेला होता. मात्र रात्री झालेल्या पावसामुळे पोलच्या खालील मातीचा भराव वाहून गेल्याने हा पोल अंगावर पडल्याचे ढगे यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. तपास पोलीस करीत आहेत.