यवत- दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजिंक्य येळे यांना एका निलंबित शिक्षक व त्याच्या कुटुंबीयांकडून शिवीगाळ व दमबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
निलेश मोहन शिर्के हे त्या दमबाजी व शिवीगाळ करणाऱ्या निलंबित शिक्षकांचे नाव असुन, या प्रकरणी निलेश शिर्के यांची पत्नी मोनिका आणि वडील मोहन शिर्के (तिघे रा. हिंगणीबेर्डी, ता. दौंड) या तिघांच्या विरोधात दौंड पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दौंडचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विनोग घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश शिर्के हा मलठण क्रमांक एक येथे नेमणुकीस होता व ८ महिन्यांपूर्वी त्यास विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर इंदापूर तालुक्यात बदली झाली होती परंतु तेथे हजर झाला नव्हता. गट विकास अधिकारी अजिंक्य येळे हे १८ जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करीत असताना त्यांना निलंबित शिक्षक निलेश मोहन शिर्के, त्याची पत्नी मोनिका आणि वडील मोहन शिर्के (तिघे रा. हिंगणीबेर्डी, ता. दौंड) यांनी अडविले. ` माझे निलंबन रद्द करा `, असे म्हणत निलेश शिर्के याने रस्ता अडविला. परंतु त्या दरम्यान पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कक्षाबाहेर आले व त्यांनी शिर्के कुटुंबीयांना बाजूला केल्यानंतर अजिंक्य येळे हे त्यांच्या कक्षात गेले.
दरम्यान त्यानंतर अजिंक्य येळे यांच्या दालनात वरीष्ठ अधिकाऱ्यांची हैठक सुरु असतांना, निलेश, त्याची पत्नी, व त्यांच्या वडील दालनात शिरले. व त्याही ठिकाणी शिर्के यांनी अजिंक्य येळे यांना उद्देशून ` तुम्ही एक भ्रष्ट अधिकारी आहे ` , असे म्हणत शिवीगाळ करून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. तसेच या दरम्यान निलेश याने टेबलवरील कागदपत्रे अस्तव्यस्त करून पुन्हा शिवीगाळ आणि दमदाटी केली. शिर्के कुटुंबिय दालनातून निघुन गेल्यानंतर, अजिंक्य येळे पोलीसात तक्रार दिली. येळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दौंड पोलिसांनी निलेश शिर्के व त्याची पत्नी, वडील अशा तिघांविरूध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.व पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आबनावे करीत आहेत.