(Ahmednagar Crime) अहमदनगर : केडगाव परिसरात भरदिवसा उघड्या घरातून मोबाईल चोरी करून दुकानदारांना विकणाऱ्या एका अल्पवयीनसह दोन दुकान मालकांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी विविध कंपनीचे ३२ मोबाईल फोन व २ टॅब असा ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जगदंबा मोबाईल शॉपी चालक सतिष रघुनाथ दुबे (वय २३, रा. मोहिनीनगर, केडगाव, व अस्लम मोबाईल शॉपी चालक फकीर मोहंमद सय्यद (वय – २५) रा. केडगांव व एक अल्पवयीन चोरटा अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कविता संदिप पांढरपोटे (वय – ३९, रा बेलेश्वर कॉलनी, आगरकरमळा, अहमदनगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
कोतवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची माहिती…!
फिर्यादी कविता पांढरपोटे यांच्या घरातून ३० जानेवारीला चार वाजण्याच्या सुमारास मोबाईल चोरी झाला होता. पांढरपोटे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा एका अल्पवयीन मुलाने केला असून, गुन्हयातील चोरीस गेला मोबाईल फोन घेऊन केडगांव लिंकरोड परिसरात येणार आहे. गुन्हे शोध पथकाने लिंकरोड परिसर येथे सापळा लावला. त्यानंतर सदर ठिकाणी एक अल्पवयीन मुलगा आला व तो त्याच्याकडील एक मोबाईल फोन दोन हजार रुपयांना तेथील काही लोकांना विक्री करण्याकरिता विचारपुस करीत होता. तेव्हा पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले.
दरम्यान, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी केली असता, सदरचा मोबाईल फोन हा बेलेश्वर कॉलनी आगकरमळा येथून चोरी केला होता. तसेच केडगांव परिसरातून दिवसा उघडे असणारे घरातून वेगवेगळ्या ठिकाणावरुन अनेक मोबाईल फोन व टॅब चोरी केलेले असुन ते त्या फोनचे सिक्युरिटी लॉक तोडण्याकरिता व फॉरमॅट करण्याकरिता केडगांव येथील जगदंबा मोबाईल शॉपी व अस्लम मोबाईल शॉपी यांच्याकडे विक्रीसाठी दिले असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार दोन्ही मोबाईल दुकान चालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी विविध कंपनीचे ३२ मोबाईल फोन व २ टॅब असा ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ३४ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. तपास पोलीस हवालदार गणेश धोत्रे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, मपोसई शितल मुगडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाडे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अशोक सायकर, अशोक कांबळे, जयश्री सुद्रिक यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime : किरकोळ कारणावरून तरुणावर धारधार हत्याराने वार; आंबेगाव बुद्रुक येथील घटना