पुणे : खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासह चॅप्टर केस एलसीबीऐवजी स्थानिक स्तरावर करण्यासाठी १६ हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस हवालदारासह त्याच्या एजंटला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (ता.२५) बोदवड तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आली.
बोदवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार वसंत नामदेव निकम (वय-५२ रा.आयटीआय कॉलनी, जामनेर ता.जामनेर जि.जळगाव.) एजंट एकनाथ कृष्णा बावस्कर (वय.65 ) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदार व एजंटचे नाव आहे. याप्रकरणी बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील २८ वर्षाच्या पत्रकाराने जळगाव एसीबीकडे तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पत्रकार असून त्यांच्यावर व त्यांचे तीन पत्रकार मित्र तसेच सामाजिक कार्यकर्ते अशा चौघांविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार वसंत निकम यांचेकडे आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी वसंत निकम यांची भेट घेतली.
त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना गुन्ह्यात मदत करून ‘ब’ फायनल पाठविण्यासाठी, तसेच दाखल गुन्ह्यातील आरोपींना एलसीबी कार्यालय जळगाव येथे चॅप्टरसाठी न पाठवता बोदवड तहसिल कार्यालयात हजर करून चॅप्टर केस करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे २० हजार रुपये लाच मागितली. तडजोडी अंती १६ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे शुक्रवारी (ता. २४) तक्रार दिली.
दरम्यान, जळगाव एसीबीच्या पथकाने शनिवारी (ता.२५) पंचासमक्ष पडताळणी केली असता वसंत निकम यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 16 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने बोदवड तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. मागणी केलेली लाचेची रक्कम निकम यांच्या सांगण्यावरून एजंट एकनाथ बावस्कर यांना स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या दोघांवर बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.