पुणे : पांढरकर नगर आकुर्डी येथील अगरबत्तीच्या कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. ही आगीची घटना आज (ता. ६) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तसेच एका शाळेला लागून हा कारखाना असून लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आकुर्डी येथील अगरबत्तीच्या कंपनीत अचानक आग लागली. शाळेजवळ आग लागल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. शाळेतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.
काही नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल असून त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरू आहेत. आगीचे लोट आणि धूर मोठ्या प्रमाणात असल्याने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली.