पुणे : चाकण येथे तडीपारी संपलेल्या गुन्हेगार मोनेश घोगरे हा सोमवारी (ता.२१) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना, आठ ते दहा जनांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला करून खून केल्याची घटना ताजी असतानाच, अजून एका सराईत गुन्हेगारावर सहा जणांनी मिळून भर वस्तीत कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना नाना पेठेतील राजेवाडी परिसरात मंगळवारी (ता.२२) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी महिलेसह तिघांना अटक केली आहे.
रोहन रवींद्र रोहन (सर्वे नं ८९८, राजेवाडी, नाना पेठ, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुशांत उर्फ मट्या कुचेकर, तेजस जावळे, राजन उर्फ रोहित काउंटर, अतिश उर्फ प्रकाश फाळके, आदित्य केंजळे आणि उषा कुचेकर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. समर्थ पोलिसांनी यातील महिलेसह तिघांना अटक केली आहे.
समर्थ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन पवार आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी रोहन पवार याचा काटा काढायचा ठरविला.
मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी राजन उर्फ रोहित काउंटर याने रोहित याला राहत्या घरातून बाहेर बोलावून घेतले.
त्यानंतर आरोपींनी रोहन याच्यावर कोयत्याने वार केले. त्यातील आरोपी सुशांत कुचेकर यांनी कोयत्याने रोहनच्या अंगावर व हातावर वार केले. तर तेजस जावळे यांनी चाकूने अंगावर आणि तोंडावर वार केले.
इतर आरोपींनी रोहनच्या तोंडावर आणि अंगावर विटांनी मारहाण करून त्याला ठार मारले. मध्यरात्री भर वस्तीत घडलेल्या या प्रकाराने काही काळ दहशत पसरली होती.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, समर्थ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र इतर आरोपी पसार झाले आहेत. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे करीत आहे.