Accident पुणे : मुंबई – बंगळुरू महामार्गावर नवले पुल परिसरात शुक्रवारी (ता. ०५) कंटेनरने चारचाकी गाडीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर कंटेनर चालक फरार…!
नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. कंटेनर आणि कारच्या या अपघातानंतर मुंबई – बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या होत्या. या अपघातानंतर तात्काळ वाहतूक कर्मचारी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसंच अपघातग्रस्त कंटेनर आणि कार क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आले आहे.
दोन दिवसआधी बुधवारी देखील कंटेनर आणि ट्रकचा याच परिसरात अपघात झाला होता. त्या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला होता.नवले पुल परिसरात मागील वर्षापासून अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कात्रजचा नवा बोगदा ते नवले पूल आणि वडगाव पूल हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
दरम्यान, नवले पुलाजवळील हा मार्ग अतिशय धोकादायक ठरतो आहे. या मार्गावर इतक्या मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, की प्रशासनाकडून हा परिसर ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आला आहे. वाढत्या अपघातादरम्यान तात्पुरत्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. मात्र परिसरात अपघातांची संख्या वाढतेच आहे.