पुणे : आमच्या परिसरात तुझे काय काम आहे असे म्हणून एका तरुणाला चारचाकी गाडीतून निर्जनस्थळी नेहून त्याला नग्न करून मारहाण केली. तसेच मारहाण करणाऱ्यांनी संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काढल्याची घटना मुंढव्यातील केशवनगर परिसरात घडली आहे. ही घटना १९ डिसेंबर २०२२ रोजी घडली होती.
याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित तरुणाच्या तक्रारीवरून एका महिलेसह ६ जणांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय जालिंदर गलांडे (वय ३५), गणेश जनार्दन गलांडे (वय ३२), अमोल उर्फ बाबू दत्तात्रय गायकवाड, विकास उर्फ विकी गलांडे, विजय दरेकर (५०, रा. सर्व. केशवनगर, मुंढवा) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय गलांडे आणि तक्रारदार हे एकमेकांचे चांगले ओळखीचे आहेत. तक्रारदार केशवनगर परिसरातून जात असताना आरोपीने त्यांना अडविले, तू आमच्या परिसरात कशासाठी येतो असे म्हणून तरुणाला मारहाण केली.
तसेच गाडीमधून दुसऱ्या ठिकाणी नेले. तेथे इतर आरोपींनी मिळून तरुणाला नग्न करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी ३२ वर्षीय पीडित तरुणाच्या तक्रारीवरून मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.