बार्शी : छातीत जळजळ होणे, पोटात दुखणे या आजाराने त्रस्त असलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाने उपचार सुरू असतानाच रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बार्शीत घडली आहे. हि घटना बुधवारी (ता. १५) दुपारी जगदाळे मामा रुग्णालयात घडली आहे.
सोमनाथ बिभीषण पिसाळ (वय-३२ रा. बार्शी, जि. सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच रुग्णालया बाहेर पत्नीने आणि मुलांनी हंबरडा फोडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ पिसाळ याच्याकडे वेल्डिंगचे काम करण्याची कला अवगत होती. परराज्यात जाऊन त्याने वेल्डिंगची कामे केली होती. छातीत जळजळ होणे, पोटात दुखणे या आजाराने सोमनाथ ग्रस्त होता.
सोलापूर शहरातील एका तज्ञ डॉक्टरांकडे देखील सोमनाथने उपचार घेतले होते. बार्शीमधील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. अखेर त्रास वाढत चालल्याने त्याला जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
बुधवारी दुपारी आईसोबत पोटभरून जेवण केलं. मोकळ्या मनाने चर्चा केली. त्यानंतर रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. शिशु विभागातील रूम क्रमांक सी- सहामध्ये जाऊन गळफास घेतला. रुग्णाने गळफास घेतल्याची बाब रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली.
त्यांनी ताबडतोब गळफास घेतलेल्या सोमनाथ पिसाळच्या नातेवाईकांना माहिती दिली व पोलिसांनी बोलावून घेतले. बार्शी शहर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.
दरम्यान, सोमनाथ यांना दोन मुलं आहेत. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयाबाहेर त्याच्या पत्नीने आणि मुलांनी हंबरडा फोडला.