लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत दुचाकी व कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात उरुळी कांचन येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. हि घटना बुधवारी (ता. १०) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली असून अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे.
राजू शंकर लंगोटे (वय-२८, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू लंगोटे हा उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत राहतो. बुधवारी राजू हा उरुळी कांचन येथून पुणे-सोलापूर महामार्गावरून त्याच्याकडे असलेल्या दुचाकीवरून पुण्याकडे पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास निघाला होता. यावेळी कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराजवळ कंटेनरला राजू चालवीत असलेल्या दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्याला मोठ्या प्रमाणत गंभीर जखमा झाल्या. त्याला तात्काळ लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सदर घटनेची महिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलीस हवालदार विजय जाधव, पोलीस नाईक जगताप, एसपीओ राहुल गायकवाड हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असून कंटेनर चालक फरार झाला आहे. तसेच नेमके अपघात हा कसा झाला याचा तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.