पुणे : किरकोळ वादातून पुण्यातील युवकाचा लोखंडी सळईने निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घराच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यात पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना पानशेतजवळील कुरण गावच्या हद्दीतील रानवडी (ता. वेल्हे) येथे घडली. याप्रकणी वेल्हे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
नितीन रामभाऊ निवंगुणे व विजय दत्तात्रय निवंगुणे (दोघे रा. आंबी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विजय प्रफुल्ल काळोखे (वय 38, रा. कन्याशाळेजवळ, विजय लॉज बिल्डिंग, अप्पा बळवंत चौक, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी पानशेत पोलीस चौकीचे पोलिस नाईक अजयकुमार शिंदे यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १३ ) दुपारी दोन ते शनिवारी (ता. १४) सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस नाईक अजयकुमार शिंदे यांना रानवडी येथे आरोपी नितीन निवंगुणे व विजय निवंगुणे यांनी एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह हा नितीन निवंगुणे याच्या शेतात टाकला आहे, अशी माहिती सकाळी खबर्याकडून मिळाली. ही माहिती मिळताच वेल्हेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व उपनिरीक्षक महेश कदम हे पानशेत येथे तातडीने दाखल झाले. नितीन निवंगुणे व विजय निवंगुणे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्या वेळी दोघांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दोघांना विश्वासात घेत विचारपूस केली असता, नितीन निवंगुणे याने गुन्ह्याची कबुली दिली. मृत विजय काळोखे हा मानसिक त्रास देत असल्याने त्याने नितीन याला फोन करून पुण्यात भेटण्यास बोलविले होते. तेथून मयत विजय काळोखे व नितीन निवंगुणे हे मोटारसायकलवरून आंबी चालले होते. आंबी रस्त्यावरील रानवडी येथील नितीन निवंगुणे याच्या शेतातील पत्र्याचे कंपाउंड उघडे दिसल्याने ते बंद करण्यासाठी नितीन तेथे थांबला.
त्या वेळी विजय काळोखे हा कंपाउंडमध्ये आला. तेथे विजय काळोखे हा नितीन याला शिवीगाळ करू लागला. नितीन याने त्याला शिवीगाळ करू नको, असे सांगूनही तो शिवीगाळ करीत होता. त्या वेळी नितीन याचा चुलत भाऊ विजय दत्तात्रय निवंगुणे हा तेथे आला. त्याने नितीन व मृत्यू विजय काळोखे यांच्यातील भांडणे पाहून काय झाले, असे विचारले. त्या वेळी मृत्यू विजय काळोखे हा विजय निवंगुणे यास शिवीगाळ करू लागला. त्यामुळे रागात विजय निवंगुणे याने वीट विजय काळोखे याच्या डोक्यात घातली.
त्यानंतरही मयत विजय शिवीगाळ करीत दोघांवर धावून आला. त्यानंतर नितीन व विजय निवंगुणे यांनी लोखंडी अँगल व रॉडने विजय काळोखे याचा निर्घृण खून केला.
नितीन निवंगुणे याने शेतात घर बांधण्यासाठी एक वर्षापूर्वी खोल पाया घेतला होता. त्या खोल खड्ड्यात विजय काळोखे याचा मृतदेह पुरून ठेवला होता. त्यावर गवत टाकून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.