इंदापूर : इंदापूरातील पोलिस कर्मचाऱ्याचे अफेअर उघडकीस आणले म्हणून त्याने दिलेल्या त्रासामुळेच युवा किर्तनकाराने आत्महत्या केली आहे. अशी लेखी तक्रार युवा किर्तनकाराच्या बहिणीने इंदापूरातील पोलिस ठाण्यात दिली आहे.
इंदापूरातील युवा किर्तनकार संजय मोरे याने काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या संजय मोरेचे नातेवाईकांनी संजय मोरे याचे पार्थिव घेऊन थेट इंदापूर पोलिस ठाण्यात पोचले. तेथे त्यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी यासंदर्भात त्यांना ताकास तूर लागू दिले नाही. त्यानंतर संजय मोरे यांनी बहिण अश्विनी मोरे यांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
अश्विनी मोरे हिने दिलेल्या तक्रारीनुसार, इंदापूर पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने सातत्याने मारहाण व शिवीगाळ केल्याने कंटाळून संजय याने आत्महत्या केली आहे. या पोलिस कर्मचाऱ्याचे संजयचे कौटुंबिक संबंध असलेल्या ठिकाणच्या एका मुलीशी अफेअर होते. त्यातून ही माहिती संजय याने संबंधितांना दिल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने संजय यास धमकी दिली. माझ्याविरोधात कोठेही तक्रार केली, तर मी देखील पोलिस आहे, तुम्हाला खोट्या केसमध्ये गुंतवीन अशी धमकी देत त्याने मारहाण केली आहे.
दरम्यान, पोलिस कर्मचारी हा ८ सप्टेंबरला मोरे यांच्या घरी आला व त्याने पुन्हा कुटुंबियांना शिवीगाळ केली. पोलिसांत तक्रार केली, तर तुमचे काही खरे नाही, मी देखील पोलिसच आहे. असे सांगत माझ्या प्रकरणात पडू नका, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. या सततच्या धमक्यांना व त्रासाला कंटाळून आपल्या भावाने आत्महत्या केल्याचा दावा अश्विनी मोरे हिने आपल्या लेखी तक्रारीत केला आहे.
याबाबत बोलताना बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे म्हणाले कि, मृत संजय मोरे यांच्या नातेवाईकांनी एक तक्रारी अर्ज दिला आहे. त्यानुसार पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रार घेतली आहे. याचा तपास सुरू असून, यामध्ये संबंधीत पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास, योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे.