पुणे : खडकवासला धरणात अक्टिव्हा दुचाकीवरून गावाकडून पुण्याकडे जाणारी महिला कोसळून बेपत्ता झाली असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस तिचा शोध घेत आहते.
अलका विनायक राऊत ( वय ३४,मुळ राहणार घिसर , ता. वेल्हे , सध्या रा.वडगाव बुद्रुक सिंहगड रोड ) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे.
शनिवारी (ता.५)रोजी स्थानिक मच्छीमार तसेच पीएमआरडीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धरणात शोध कार्य सुरू केले .अंधार पडल्याने सायंकाळी उशिरा शोध कार्य थांबवण्यात आले.आज (रविवारी) पुन्हा शोध घेतला जाणार असल्याचे वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार सांगितले.
पुणे पानशेत रस्त्यावर कुरण गावच्या हद्दीत माऊलाई मंदिरा जवळ खडकवासला धरणात अक्टिव्हा दुचाकीवरून गावाकडून पुण्याकडे जाणाऱ्या अलका या कोसळून बेपत्ता झाल्या असाव्यात अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. धरणाच्या तिरावर असलेल्या झाडात अडकलेल्या अवस्थेत अलका यांची अक्टिव्हा सापडल्याने त्या धरणात कोसळून बेपत्ता झाल्या असाव्यात असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
शुक्रवारी ( ता.४) रोजी वडगाव बुद्रुक येथून अक्टिव्हा दुचाकीवरून वेल्हे येथे पोस्ट ऑफिसमध्ये आल्या होत्या. वेल्हे येथे त्यांचा चुलत भाऊ सुरेश नथू धिंडले यांना त्या भेटल्या.नंतर त्या पुण्याकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र त्या अद्याप घरी पोहोचल्या नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी अलका यांचा शोध घेत असताना त्यांची एक्टिवा गाडी कुरण गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या तिरावर झाडात अडकलेल्या अवस्थेत सापडली.