सागर जगदाळे
भिगवण : पुणे – सोलापूर महामार्गावर मदनवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत भरधाव दुचाकीने पाठीमागून अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत २० वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. हि घटना बुधवारी (ता. ०८) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
साहिल उर्फ बंटी मोहन भोसले (वय -२० सध्या रा. तळजाई वसाहत, ओम मित्र मंडळ चौक पद्मावती पुणे ०९, व मुळ रा. परिते ता. माढा जि.सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे तर सनी सत्यवान भोसले (वय- २१, रा. सदर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दुचाकीवरील तरुण एकमेकांचे नात्याने सख्खे चूलत भाऊ आहेत. याप्रकरणी हनुमंत अनंता भोसले (वय – ४९, रा. परिते ता. माढा) यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी साहिल व सनी त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकीवरून परिते गावाकडून पुण्याच्या ठिकाणी दुचाकीवरून निघाले होते. साहिल हा दुचाकी चालवत होता तर सनी हा त्याच्या पाठीमागे बसला होता. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भिगवण ग्रामपंचायत हद्दीत आले असता साहिल चालवीत असलेल्या दुचाकीचा वेग जास्त असल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले व पुढे असलेल्या अज्ञात वाहनाला जोरात धडकला.
दरम्यान, या अपघातात साहिल याच्या डोकीस, कपाळाला, छातीला, पोटाला हाताला, पायाला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. तर पाठीमागे बसलेला त्याचा चुलतभाऊ सनी हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ वा ॲम्बुलन्स मधून भिगवण येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार लोढी हे करीत आहे.