पुणे : वडगावशेरी येथील भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी (ता.३) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या आगीत तब्बल १० ते १२ सिलेंडरचा स्फोट झाला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
वडगाव शेरी येथील सोपान नगरमध्ये पाच ते सहा हजार स्क्वेअर फुटमध्ये प्लास्टिकच्या भंगार मालाचे गोडाऊन होते. या गोडाऊनला अचानक आग लागली. गोडाऊनमध्ये असलेल्या १० ते १२ सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.
या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून तासभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.मात्र, आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.