पुणे : बुलढाणा येथील स्टेट बँकेच्या मॅनेजरचा लॉज चालकाने खूप पैसे असावेत, या समजातून उसाच्या शेतात नेहून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. एसीबीचा कारभार स्वीकारणारे पोलीस निरीक्षक अशोक लांडे आणि त्यांच्या पथकाने या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली आहे.
उत्कर्ष पाटील (वय वर्ष 36, राहणार मुंबई) असे खून झालेल्या बँकेच्या मॅनेजरचे नाव आहे. गणेश देशमाने (रा. चिखली, बुलढाणा) असे लॉज चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष पाटील हे चार महिन्यांपूर्वी बदली होऊन उत्कर्ष पाटील बुलढाणा जिल्ह्यात आले होते. शाखा व्यवस्थापक सुट्टीवर असेल तिथे पाटील यांना डेपुटेशनवर पाठवले जात होते. शेवटच्या पंधरा दिवसात ते हिरडव शाखेचा कारभार पाहत होते. त्यांचा परिवार मुंबईत असल्याने ते लॉजवर थांबायचे. त्यामुळे त्यांची परिसरात ओळख कमी होती.
उत्कर्ष पाटील हे मेहकर शहरातील एका लॉजवर थांबायचे. त्या लॉजवर चिखलीचा गणेश देशमाने मॅनेजर म्हणून काम करायचा. तिथे दोघांचा परिचय झाला. लॉजवरील इतर ग्राहक बाहेर जाताना चावी लॉज काऊंटरवर ठेवायचे, मात्र पाटील चावी सोबत घेऊन जायचे. त्यामुळे पाटील यांच्याकडे जास्त पैसा असेल, असे गणेश देशमाने याला वाटत होतं. त्यामुळे त्यांचा खून करायचा, असे गणेशने ठरवले होते.
पगार परवडत नसल्याचे कारण पुढे करुन घटनेच्या आठ दिवस आधी गणेशने लॉजवरील नोकरी सोडली होती. मात्र तरी फोनवरून तो गोड बोलून पाटील यांच्या संपर्कात होता. ३१ डिसेंबरला मेहकर शहरातून वाईन शॉपवरून दारू सोबत घेत गणेशने उत्कर्ष पाटील यांना सारंगपूर भागात नेले.
तिथेच धारदार शस्त्राने त्याने पाटील यांचा खून केला. मृतदेह शेतातील नाल्यात फेकून त्यावर गाजर गवत टाकून दिले. रविवारी (ता. ०१) बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार रस्त्यावरील सारंगपूर फाट्याजवळ असलेल्या उसाच्या शेतात उत्कर्ष पाटील यांचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांना घटनास्थळी दोन मोबाईल सापडले. त्यापैकी एक गणेश देशमाने तर दुसरा पाटील यांचा होता. पाटील यांचा खून झाल्यानंतरही त्यांच्या एटीएम कार्डच्या माध्यमातून दोन वेळा पैसे काढल्याचे समोर आले.
या माहितीनंतर पोलिसांनी उत्कर्ष पाटील राहत असलेल्या लॉजवर आणि जेवायला जात असल्या ठिकाणी चौकशी केली. पोलिसांनी गणेश देशमानेच्या पत्नीचीही चौकशी केली. आधी उत्तरं द्यायला टाळाटाळ करणारी गणेशची पत्नी पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर बोलू लागली.
खून करून गणेश याने घरी कपडे बदलल्यानंतर रक्ताने माखलेली कपडे डोनगाव रस्त्यावरील क्रीडा संकुलाजवळ कपडे फेकल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी ते कपडे ताब्यात घेतले आहेत. खून करून गणेश पसार झाला होता. नुकतेच एलसीबीची धुरा हाती घेतलेल्या अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात एक पथक गणेशच्या मागावर होते. ४ जानेवारीच्या संध्याकाळी त्याला डोंबिवली भागातून ताब्यात घेण्यात आल्याचे एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांनी सांगितले.