पुणे : ठेकेदारकडून घरगुती ग्राहकांच्या वीज जोडणीच्या कामांचे मंजुरी पत्रक तयार करण्याकरीता २ हजाराची लाच स्वीकारताना राजगुरुनगर (ता. खेड) येथील महावितरणच्या उपविभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता.२३) सायंकाळी रंगेहाथ पकडले.
अजय दत्तात्रय शेवकरी (कनिष्ठ अभियंता,राजगुरुनगर उपविभाग, ता. खेड, जि. पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २६ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एक ठेकेदार आहेत. त्यांच्याकडील ग्राहकांचे घरगुती वीज जोडणीच्या कामांचे मंजुरी पत्रक तयार करण्याकरीता शासकिय शुल्काव्यतिरिक्त आरोपी अजय शेवकरी यांनी ६ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती २ हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी करून आरोपी अजय शेवकरी यांना तक्रारदार यांच्याकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यानुसार अजय शेवकरी यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व अटक केली. आरोपीला मा. विशेष न्यायालय, खेड येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपीला सोमवार (ता.२७) पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक क्रांती पवार करत आहेत.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.