लोणावळा : मित्राबरोबर लग्न करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका २० वर्षीय तरुणीवर एका माथेफिरू तरुणाने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना (सोम. ता.३१) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कामशेत (ता. मावळ) परिसरातील घडली.
याप्रकरणी संबंधित तरुणीने कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्या तक्रारीनुसार कामशेत पोलिसांनी सुनील रामदास ढोरे (वय २२, रा. मोरया कॉलनी, वडगाव मावळ) व एक अनोळखी आरोपी (वय अंदाजे २० ते २५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी कचऱ्याची पिशवी कचराकुंडीत टाकत असताना एका अनोळखी आरोपीने फिर्यादीच्या मानेवर अचानक वार केला. त्यावेळी या तरुणीने मागे वळून पाहिले असता आरोपीने माझा मित्र सुनील ढोरे याच्याशी लग्न करण्यास का नकार दिला? असे म्हणून हातातील धारदार कोयत्याने मानेवर अजून वार करण्याचा प्रयत्न केला. तो कोयता फिर्यादीने दोन्ही हातांनी धरला. त्यानंतर, आरोपीने कोयता जोरात ओढल्याने फिर्यादीच्या दोन्ही हातांना दुखापत झाली.
याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.