पुणे : सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरील वाहनचालकांना मारहाण करून लुटणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या सिंहगड पोलिसांनी आवळल्या आहेत.
विनोद शिवाजी जामदारे (वय -३२, रा. जाधवनगर, वडगांव), रोहीत विकास शिनगारे (वय – १९ रा. जुनी म्हाडा कॉलनी, हडपसर), विशाल विठ्ठल रणदिवे (वय- २२ रा. बार्शी, जि. सोलापुर), गौरव गंगाधर शिंदे, रा. मु.पो. ताडसौदने, ता. बार्शी जि . सोलापुर) नितीन सुरेश जोगदंड (वय – ३५, रा. अपर इंदिरा नगर, बिबवेवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २०) सिंहगड पोलीसांचे पथक पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास नवले ब्रिज या ठिकाणी गस्त घालीत असताना कार्यरत असलेले पोलीस अंमलदार व अधिकारी यांना एका इसमाने सांगितले कि, माझी चारचाकी गाडी असून ती भाडेतत्त्वावर लावलेली असून दीड वाजण्याच्या सुमारास हिंगणे चौकाजवळील आपना फॉर्मसी येथून भाडे पिकअप करणे करीता थांबलो असता, दोन इसमांनी सदर ठिकाणी येऊन हाताने मारहाण केली. यावेळी गाडीमध्ये जबरदस्तीने कोंबून इतर साथीदारांना बोलावून हिंगणे स्मशानभुमी या ठिकाणी सहा ते सात जणांनी मारहाण केली.
त्याच्याकडून रोख रक्कम, एक मोबाईल कढून घेतले व घरून ५० हजार रुपये मागाव नाहीतर तुला मारून टाकतो अशी धमकी देऊन अंगावरील सगळे कपडे काढून त्याला विवस्त्र करून गाडीत टाकून जबरदस्तीने घेवून जात होते. गाडीतील पेट्रोल संपल्यामुळे सदर आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले. चौकीत तक्रार देण्यासाठी जात असताना रस्तात पोलीस पेट्रोलींग गाडी भेटल्याने घडलेली घटना सांगितली.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव यांना सदर घटनेची माहिती देऊन त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस पथक व गुन्हे शोध पथकाच्या पथकाने कात्रज रोडवरील बी.पी च्या पेट्रोल पंपा समोर पळून जात असताना सदर आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांना नाव व पत्ता विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली. तसेच गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक कादबाने करीत आहेत.
सदरची कामगिरी सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहायक पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, राहुल यादव, दिपक कादबाने, सहायक पोलीस उपनिरीक्षक कुरळे, उतेकर पोलीस हवालदार केकाण, अमित साळुंके, पोलीस अंमलदार देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर यांनी केली आहे .
दरम्यान, विनोद जामदारे याचे विरुध्द सिहंगड रोड, दत्तवाड़ी, वारजे, माळवाडी येथे खुन, दरोडा, खंडणी यासारखे ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गौरव शिंदे याचे बार्शी पो. ठाणे येथे खुनाचा प्रयत्न यासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. नितीन सुरेश जागदंड याचे विरुध्द दत्तवाडी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे.