हडपसर : दारू पिताना झालेल्या भांडणात मित्रानेच डोक्यात दगड घालून एकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
अनिल राजू सासी (वय ३३, रा. इंदिरानगर वसाहत, वैदवाडी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर प्रविण नामदेव नाईक (वय ४१, रा. पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा) असे खून केलेल्या आरोपीची नावे आहेत.
याबाबत मयताचा भाऊ अक्षय राजू सासी (वय- २५, रा. इंदिरानगर वसाहत, वैदवाडी, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण आणि अनिल हे दोघे मित्र होते. दोघेजण वैदवाडी कॅनॉलजवळील नर्मदाबाई कांबळे शाळेच्या मागे दारु पिण्यास बसले होते. तेव्हा त्यांच्यात भांडणे झाली. त्याचा राग मनात धरुन प्रविण याने अनिल याच्या डोळ्याच्या बाजूला व
कपाळावर दगडाने मारले. त्यात अनिल हा गंभीर जखमी झाला होता. त्याला ससून रुग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान, अनिलवर उपचार सुरु असताना रविवारी पहाटे त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी प्रविण नाईक याला अटक केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक डांगे करीत आहेत.