शुभम वाकचौरे
जांबूत, (पुणे) : नगर – कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील उदापुर (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीतील पुष्पावती नदीजवळ आयशर टेम्पो व स्कोडा चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात टेम्पोचालक एका ६० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या रोपवाटिकेच्या समोरच हा अपघात झाला आहे.
टेम्पोचालक मनोहर अप्पाराव इंगळे (वय – ६१,) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. तर रमाबाई बाळू शिद व नाना गोमू शिद (रा. दोघेही सावरीची वाडी, ता. मुरबाड जि. ठाणे) असे गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर – कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील उदापुर ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या बाजूला मनोहर इंगळे हे टेम्पोच्या पाठीमागे उभे राहिले होते. यावेळी पाठीमागून आलेली भरधाव चारचाकीने इंगळे यांना जोरदार धडक दिली. या धडकेत इंगळे यांचा जागेवरच मृत्यू झाला तर याच अपघातात रमाबाई शिद व नाना शिद हे दोघेजण जखमी झाले आहेत.
दरम्यान, कार चालक नशेत तरर्र असल्याने अपघात घडला असल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली. यावेळी अपघातानंतर कारचालकास जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गाडी चालक व मालकाचे नाव समजू शकले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत. पुढील तपास ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक एस. डी. गेंगजे करीत आहेत.