दौंड : पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दौंड तालुक्यातील पारगाव परिसरात घडली आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मारुती बाजीराव दिवेकर (वय ७५, रा. पारगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे मृत्यु झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकणी दिवेकर यांचे नातेवाईक रामकृष्ण ताकवणे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
मिळालेल्या माहिती नुसार, दिवेकर यांचे रेणुका मंदिर परिसरात शेत आहे. ते पिकाला पाणी देत होते. त्या वेळी विद्युत खांबाला त्यांचा हात लागला. खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे दिवेकर यांना धक्का बसला आणि ते जागीच कोसळले. त्यानंतर दिवेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू, अशी नोंद करण्यात आली आहे.
दिवेकर इलेक्ट्रिक इंजिनिअर होते. पारगावातील पहिले अभियंता असलेल्या दिवेकर यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.