राहुलकुमार अवचट
यवत : पारगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात सात जणांचे हत्याकांड झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता गावातील एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.१०) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. यामुळे पारगावसह दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
भालचंद्र ऊर्फ विकास पोपट जगताप (वय -४२) व जयश्री भालचंद्र ऊर्फ विकास जगताप (वय-३५), असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास आणि जयश्री यांचा प्रेमविवाह झाला होता. जयश्री ही विकास यांच्या मामांची मुलगी होती. विकास यांचा पारगावात दुचाकी आणि चारचाकी वॉशिंग सेंटरचा व्यवसाय आहे. तसेच ते जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करीत होते, तर त्यांची पत्नी ही ब्युटी पार्लर चालवित होत्या. या दाम्पत्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत दोन्ही व्यवसायात चांगलाच जम बसविला होता.
दरम्यान, विकास आणि जयश्री हे गुरुवारी (ता.९) जेवण करून झोपण्यासाठी रुममध्ये गेले होते. शुक्रवारी (ता.१०) सकाळी आई-वडील उशीर झाला तरी उठले नसल्याने मुलगा यश याने दरवाजा ठोठावला. मात्र आतमधून कोणत्याही स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मुलाने शेजारांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला. तेव्हा एका खोलीत आई जयश्री व शेजारील खोलीत वडील विकास हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात पाठविले. त्यानंतर शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. स्वभावाने अतिशय शांत असणाऱ्या दाम्पत्याने आत्महत्येचा निर्णय का घेतला. याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.
जगताप दाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण अध्याप समजू शकले नाही. तर याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.