मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती झालेल्या भीषण अपघातप्रकरणी माजी आमदार विनायक मेटे यांच्या चालक एकनाथ कदम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणावर सीआयडीकडून अधिक तपास करताना हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शिवसंग्राम पक्षाचे नेते व माजी आमदार याच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याचा ठपका त्याच्याच वाहनचालकावर ठेवण्यात आला असून त्याच्यावर सीआयडी कलम ३०४ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सीआयडीने विनायक मेटे यांची कार ज्या मार्गाने अपघातस्थळापर्यंत पोचली त्या प्रत्येक मार्गाचे सीसीटीव्हीचे फुटेज तपासले.
याशिवाय अपघात कसा झाला, यात चूक कुणाची हे देखील तपासण्यासाठी आयआरबीचे अभियंते व रस्ते अभियंत्याची तांत्रिक समिती देखील बनविण्यात आली होती. या समितीची देखील मदत या प्रकरणात घेण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार मेटे यांचा वाहन चालक सुमारे १२० ते १४० च्या वेगाने गाडी चालवत होता. कारला अपघात होण्यापूर्वी चालक एकनाथ कदम उजव्या बाजूने गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता.
मात्र, समोरच्या बाजूला दुसरे वाहन ओव्हरटेक करत असल्याने आपली गाडी तेवढ्या जागेत बसणार नाही हे लक्षात आल्यावर देकील चालक कदम याने गाडी घुसविण्याचा प्रयत्न केला.
यातच डाव्या बाजूला धक्का बसून हा भीषण अपघात झाला. सीआयडीच्या तपासात हे स्पष्ट झाल्यानंतर रसायनी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.