बारामती : जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण किंवा डीजेचा वापर मिरवणुकीत करू नका असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या नियमांची पायमल्ली करणाऱ्या तसेच चिथावनेखोर भाषण केल्या प्रकरणात मोरगाव येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोपट उर्फ कैलास सर्जेराव तावरे, निलेश हरिभाउ केदारी, अक्षय यशवंत तावरे, सुरज प्रल्हाद तावरे, समीर कैलास जाधव (सर्व रा. मोरगाव ता. बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ५ जणांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार तुषार शिवाजी जैनक यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरगाव ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. २०) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वरील आरोपींनी विनापरवाना विजयी मिरवणूक काढुन जेसीबीच्या सहायाने गुलालाची उधळन करताना विनापरवाना डीजेचा मिरवणुकीत वापर करुन व मयुरेश्वर मंदिरा समोर विनापरवाना भाषण करून सभ्यता व नितीमत्ता यास धोका पोहचेल असे चिथावणीखोर भाषण केले.
दरम्यान, चिथावणीखोर भाषण करून त्यांना दिलेल्या सुचनांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे पोपट तावरे, निलेश केदारी, अक्षय तावरे, सुरज तावरे, समीर जाधव यांच्यावर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक वाघोले हे करीत आहेत.