पुणे : माहेरहून हुंड्याचे पैसे घेऊन येण्यासाठी विवाहितेला चुलीतील पेटलेले लाकुड घेऊन चटके देऊन, हातपाय बांधून मिरची पावडरची पेस्ट तयार करुन ते पाणी विवाहितेच्या तोंडात, काना, डोळ्यात टाकून तिचा छळ केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना केळेवाडीतील गिरीजा सोसायटी व फिर्यादीच्या राहत्या घरी सुतारदरा येथे घडली आहे.
याप्रकरणी एका २२ वर्षाच्या विवाहितेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, नागेश कार्तिक साहेबन्ने (वय. २३), रत्ना कार्तिक साहेबन्ने (वय. ४२), महादेवी जाधव (वय. ५८) आणि लिंबराज भिसे (वय. ५८, रा. केळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार २०२१ पासून २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि नागेश साहेबन्ने यांचा ऑक्टोबर २०२१ मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर माहेरहून हुंड्याचे पैसे घेऊन ये, या कारणावरुन फिर्यादी महिलेला शिवीगाळ करुन मारहाण करुन छळ केला.
तसेच चुलीतील पेटलेले लाकुड घेऊन फिर्यादीच्या हातावर, पायावर, डोळ्याजवळ, ओठावर अनेकदा चटके दिले. फिर्यादीचे हातपाय बांधुन मिरची पावडरमध्ये पाणी मिसळून याची पेस्ट बनवून ती फिर्यादीच्या तोंडात, कानात, डोळ्यात टाकली. त्यात फिर्यादी यांना जबर दुखापत झाली.
याप्रकणी पिडीत महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार जणांविरोधात कौटुंबिक हिंसाचार व हुंडा बंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.