Bribe News जालना : भूमीगत नाली केलेल्या बांधकामाचा निधी काढून कंत्राटदाराकडे देण्यासाठी ११ हजार रूपये अथवा ब्लॅक डॉग नावाच्या दारूचे दोन खांबे लाच म्हणून मागणाऱ्या दोन ग्रामसेवकांवर बदनापूर (जि. जालना) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bribe News) हि कारवाई जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. (Bribe News)
सिद्धार्थ कृष्णा घोडके (वय-४२, मांजरगाव ता. बदनापूर), पुष्पा महाजन अंबुलगे (वय-४०, रा. उजैनपुरी ता. बदनापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या ग्रामसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मांजरगाव (ता. बदनापूर) येथील भूमीगत नाली बांधकामाला काही दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली होती. दरम्यान काम पूर्ण झाल्यामुळे एमबीवर व उर्वरित १ लाख ४८ हजार रूपये मजुरांना व साहित्य देणाऱ्या दुकानदारांना रक्कम अदा करण्याच्या परवानगी पत्रावर गटविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी लागते. ही स्वाक्षरी मिळवून देण्यासाठी बदनापूर पंचायत समितीतील लांडगे व घोडके यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
ब्लॅक डॉगचे दोन खंबे
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २० जून रोजी सापळा लावून लाचेच्या मागणीबाबत पडताळणी केली. यावेळी मांजरगावचे ग्रामसेवक सिध्दार्थ घोडके यांनी पंचासमक्ष,”तुमचे काम रिक्वेस्ट करून आणून दिले असून, त्यासाठी ११ हजार रूपये द्यावे लागतील असे म्हटले. तसेच ते शक्य नसल्यास सहा-सात हजार रूपये लगेच द्यावे लागतील, किंवा दोन हजारांना मिळणारे ब्लॅक डॉगचे दोन खांबे द्यावे लागतील, अशी मागणी केली.
दरम्यान, विशेष म्हणजे याचवेळी घोडके यांनी ग्रामसेविका अंबुलगे यांना बोलावून तुमचे किती परसेंटेज असते मॅडम सांगा असे सांगितले. त्यामुळे लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीच्या पथकाने या प्रकरणी सिद्धार्थ घोडके आणि पुष्पा अंबुलगे या दोन्ही ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल केला आहे.