पुणे : गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यासाठी बेकायदेशीर बॅनर लावल्याप्रकरणी आंबेगाव तालुक्यात तीन जणांच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी रविकिरण देशमुख (वय-३०, रा.सिन्नर ता.सिन्नर जि. नाशिक सध्या रा. जुन्नरफाटा घोडेगाव ता.आंबेगाव जि.पुणे), सुप्रित चंद्रकांत हुले (रा.लांडेवाडी पिंगळवाडी ता.आंबेगाव जि पुणे) आणि दिपकभाई सपके (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सरकारच्या वतीने नामदेव नावजी ढेंगळे (वय-२८, पोलीस अंमलदार, नेमणुक घोडेगाव पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी देशमुख, सुप्रित हुले आणि दिपकभाई सपके यांनी नारोडी (ता.आंबेगाव ) ग्रामपंचायत हद्दीतील नारोडी फाटा येथे रस्त्यावर फ्लेक्स लावले होते. हा बॅनर गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यासाठी बेकायदेशीररीत्या लावला असल्याचे पोलीस अंमलदार नामदेव ढेंगळे शुक्रवारी (ता.२) साडेचार वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले.
दरम्यान, याप्रकरणी ढेंगळे यांनी वरील तिन्ही आरोपींच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिन्ही आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्तेचे विरुपणास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक वाघ करीत आहेत,
घोडेगाव हद्दीत लावण्यात आलेल्या इतर बॅनरांची परवानगी तपासण्यात येणार आहे. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही विनापरवाना बॅनर लावू नयेत. तसेच गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे बॅनर लावल्यास कठोर कारवाई करणार आहे.
असा कडक इशारा घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी दिला आहे.