पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाल्यानंतर निकाल लागण्यापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर लावणार्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल भाऊ मानकर आणि अतुल नाईक अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुणे महापालिकेच्या परवाना व आकाश चिन्ह विभागाचे निरीक्षक युवराज विवेक वाघ (वय ३२, रा. धनकवडी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
मिळालेल्या माहिती नुसार, कसबा पेठ पोटनिवडणुकीत मतदान झाले असून येत्या २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान झाल्यानंतर वडगाव भाजी मंडई परिसरात पुलावर, फुटपाथवर २० फुट बाय २० फुट इतके रवींद्रभाऊ धंगेकर यांची कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा मजकूर असलेला फ्लेक्स लावण्यात आला. त्याखालील बाजूच्या काळ्या पट्टीमध्ये राहुल भाऊ मानकर व अतुल नाईक असे लिहिले होते.
याची माहिती मिळाल्यावर फिर्यादी व परवाना निरीक्षक अजित जोगळेकर यांनी तेथे जाऊन खात्री करुन काढून घेतला. हे काम सुरु असताना पहाड काढत असलेल्या योगेश्वर हंबरडे याच्याकडे चौकशी केली असता अतुल नाईक याने आम्हाला फ्लेक्स लावण्यास सांगितले, त्याने सांगितले. कोणतीही परवानगी न घेता फ्लेक्स लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.