पुणे : सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर काल रविवारी संध्याकाळी ५.३० ते ५.४५ एका कारने अचानक पेट घेतला. या आगीत गाडी पूर्ण जाळून खाक झाली असून सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार काल सिंहगड किल्ल्याकडे वर जाण्यासाठी घाट रस्ता चढत असताना मोरदरीच्या पुढे वळणावर अचानक कारने पेट घेतला. आग लागल्याने प्रवासी लगेच बाहेर आले. त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सदर कार नाशिक येथील होती.
आसपास असलेल्या वनरक्षक व नागरिक यांनी आग लागल्याचे वन विभागाला कळवल्याने अग्निशमन विभागाला याबाबत कळवण्यात आले. नांदेड सिटी अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूची वाहतूक कारपासून दूर थांबवली होती.
सुमारे अर्धा तास वाहतूक बंद करण्यात आली होती. काल रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक सिंहगड किल्ला व परिसर पाहण्यासाठी आले होते. संध्याकाळी बहुतांश पर्यटक परत जायाला निघाले असताना हा अपघात घडला होता.