पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एक भयंकर अपघात झाला असून एका कारने दुचाकीला धडक दिली. कारच्या धडकेने दुचाकीवरील सर्वजण उडून रस्त्यावर पडले. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बेल्हे – जुन्नर मार्गावर पारगाव तर्फे आळेजवळ जोडपं आणि त्यांचा लहान मुलगा दुचाकीवर प्रवास करत होते. त्याचवेळी ते रस्ता क्रॉस करत असताना समोरुन येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीवर बसलेला लहान मुलगा आणि महिला उडून खाली पडले. मात्र नशीब बलवत्तर म्हणून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
बेल्हे-जुन्नर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
बेल्हे-जुन्नर हा महामार्ग जसा वेगवान मार्ग झाला आहे. तेवढाच मृत्यूचा सापळाही बनत चाला आहे. बेल्हे ते शिक्रापूर दरम्यान रस्ता सुरू झाल्यापासून या रस्त्यावर आतापर्यंत ४५ बळी गेले आहे. तर, रस्त्यावर असलेली अतितीव्र वळणे, चौकात क्रॉसिंगसाठी साइन नसणे, गर्दीच्या ठिकाणी गतिरोधक नसणे यामुळे असे अनेक अपघात आतापर्यंत झाले आहेत. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याने हीच गोष्ट अनेकांच्या अपघाताचे मुख्य कारण ठरत आहे.