पुणे : जनरल मॅनेजर या पदावर काम करणार्या ३७ वर्षीय महिलेला शरीर व्यवसायासाठी जबरदस्ती करून धमकावल्याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर पाषाणकर (वय-४७), रवी गारगोटे (वय-३६), प्रवीण रहाटे (वय-३२) व एक महिला अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा गुन्हा डिसेंबर २०२१ ते १९ जुलै २०२२ दरम्यान शिवाजीनगर येथील एका प्रसिध्द शोरूममध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शिवाजीनगर परिसरातील एका प्रसिध्द शोरूममध्ये जनरल मॅनेजर या पदावर काम करीत आहेत. तर सागर पाषाणकर हा शोरूमचा मालक आहे. सागर पाषाणकर यांच्या मैत्रीणीने फिर्यादीस शरीर व्यवसाय करण्याबाबत बोलून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली. त्यानंतर सागर पाषाणकर, रवी गारगोटे आणि प्रवीण रहाटे यांनी फिर्यादीचा मानसिक छळ करून लैंगिक, आर्थिक छळ केला आणि सामाजिक विटंबना केली.
दरम्यान, आरोपी महिला आणि सागर पाषाणकर यांनी फिर्यादीला धमकावले. फिर्यादी महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.