पुणे : मैत्रिणीसमोर मारहाण करत अपमानित केल्याने एका २० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे.
प्रतीक संतोष कुतवळ (वय-२०, रा. भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रतिकचे वडील संतोष जालिंदर कुतवळ (वय-४१, रा. भोसरी ) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या प्रथमेश महादू पठारेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक आणि त्याच्या एका मैत्रिणीचे प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून मैत्रिणीसमोरच प्रतिकला मारहाण केली होती. आपल्या प्रेयसी समोरच मारहाण झाल्याने प्रतीकला ही बाब जिव्हारी लागली, त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत होते. अपमानीत झालेल्या प्रतीकने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी प्रथमेश महादू पठारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. या प्रकरणी १४ सप्टेंबर रोजी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.