सागर जगदाळे
भिगवण : मुलांना शाळेत सोडविण्यासाठी चाललेल्या दुचाकीला एका हायवा डंपरणे धडक दिल्याची धक्कादायक घटना काटी (ता. इंदापूर) येथे आज शुक्रवारी (ता. २९) उघडकीस आली आहे. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील आणि भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेने गावातील ग्रामस्थांनी हायवा डंपर पेटवून दिला आहे.
तृप्ती नानासाहेब कदम (वय 12 वर्ष) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर नानासाहेब कदम व मुलगा कृष्णा नानासाहेब कदम (वय 11 वर्ष) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी डंपर चालक विनोद महादेव जवरे ( वय 40 वर्ष, रा. खैरा, जि- यवतमाळ) याला इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेली माहिती अशी की, काटी येथील नानासाहेब कदम हे सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान बुलेट मोटरसायकल क्र.(MH-42 – AV – 3764) वरती मुलांना शाळेत सोडवण्यासाठी जात असताना रस्ते बांधकामासाठी खडीने भरलेला हायवा डंपर क्र.(MH- 42 – T-1653) ने पाठीमागून बुलेट मोटरसायकल ला धडक दिली.
या अपघातात तृप्ती ही मुलगी डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नानासाहेब कदम व मुलगा कृष्णा हे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गावकरी घटनास्थळी त्वरित जमा झाले. आणि संतप्त गावकऱ्यांनी ट्रकला पेटवून दिला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या मदतीने या हायवा डंपरची आग विझवण्यात आली असून इंदापूर पोलिसांनी हायवा डंपरचा चालक विनोद महादेव जवरे ( वय 40 वर्ष, रा. खैरा, जि- यवतमाळ) यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.