पुणे – पिंपरी चिंचवडमध्ये एका १५ वर्षीय शाळकरी मुलाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथील गव्हाणे वस्ती येथे १३ डिसेंबर रोजी घडली आहे.
मयत मुलगा दिघी रोड येथील प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिकत होता. शाळेचे मुख्याध्यापक यांनी फिर्यादी यांच्या मुलाला शाळेत शिकत असताना मारहाण करतो,शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करत नाही, शाळेतून रस्टिकेट करतो, शाळेत मुलाला पाठवू नका, असे बोलून त्याला शारीरिक व मानसिक त्रास दिला.त्यामुळे मुलाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
याबाबत मयत मुलाच्या आईने (वय-३७) शनिवारी (दि.२४) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कूल मुख्याध्यापक हितेश शर्मा (अंदाजे वय-40 रा. भोसरी) यांच्याविरुद्ध आयपीसी ३०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.