धुळे : दोघांनी कॉम्प्रेसर मशीनने बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धुळ्यातील लळींग शिवारातील पंक्चरच्या दुकानात ही घटना घडली आहे. मोहम्मद खालीक मोहम्मद गनीब (वय 14) असे मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित राजू चंद्रवंशी व शिवाजी लक्ष्मण सुळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लळींग शिवारातील सिटी पॉईंट हॉटेलच्या आवारात मोहम्मद मुजाहिद आलम यांचे टायर पंचरचे दुकान आहे. या दुकानात त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकांचा मुलगा मोहम्मद खालीक मोहम्मद गनीब हा देखील काम करत होता. त्यांच्या दुकानाशेजारीच गॅरेज असून त्या ठिकाणी रोहित राजू चंद्रवंशी व शिवाजी लक्ष्मण सुळे हे दोघे काम करतात.
शेजारीच दुकान असल्याने खालीक हा त्यांना चांगला ओळखत होता. सकाळी नेहमीप्रमाणे दोघांचं दुकान उघडं होतं. मात्र मोहम्मद मुजाहिद आलम हे सकाळी १० वाजेच्या सुमारास कामानिमित्त घरी गेले होते. त्यामुळे खालीक हा दुकानात एकटा होता. यावेळी शिवाजी व रोहित यांनी त्याची मस्करी करताना त्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसर मशीनने हवा भरली.
मोहम्मद खालीकच्या पोटात हवा गेल्याने त्याला त्रास होवू लागला. त्यामुळे शिवाजी व रोहित या दोघांनीच त्याला उपचारासाठी हिरे रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी खालिकला आयसीयुमध्ये भरती केले असता डॉक्टरांनी आतड्यांना व नसांना दुखापत झाल्याने ऑपरेशन करावे लागणार असल्याचं सांगितलं. मात्र, ऑपरेशन थिएटरमध्ये नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोहाडी पोलीस करत आहेत.