पुणे : पेठ (ता. आंबेगाव) येथील एका निवासी आश्रम शाळेतून १४ वर्षीय मुलाला पळवून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र वैजनाथ उघडे असं पळवून नेलेल्या मुलाचं नाव आहे. तर याप्रकरणी मुख्याध्यापिकेच्या फिर्यादीवरून मंचर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यात शासकीय निवासी आश्रम शाळा आहेत. या शाळांमध्ये अनेक जिल्ह्यातून पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतात. या शाळेचा संपूर्ण खर्च हा शासनाकडून केला जातो. आंबेगाव तालुक्यात साधारण ५ ते ६ निवासी शाळा असून एका शाळेत साधारण १०० ते १५० च्या आसपास विद्यार्थी आहेत. अशाच एका निवासी शाळेतून महेंद्र उघडे याला पळवून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून मंचर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, निवासी शाळांमधून मुलांना पळवून नेण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे निवासी शाळेत मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत पालकांमधून संताप व्यक्त होत असून आमच्या मुलांची सुरक्षितता करता येत नसेल तर आम्ही आमच्या मुलांना या शाळेत ठेवायचं कसं, असा संतप्त सवाल पालकांमधून उपस्थित केला जात आहे.