Loni Kalbhor News : लोणी काळभोर (पुणे) : पुण्यातील लोणी काळभोर थेऊर फाटा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मोठा भाऊ मयत झाल्यानंतर लहान भावाने त्याच्या खात्यातील तब्बल १८ लाखाहून अधिक रक्कम काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोठा भाऊ ट्रान्सपोर्ट व्यावसायिक होता. तो एक महिन्यापूर्वी मयत झाला होता.
गुन्हा दाखल
दरम्यान त्याच्याच सख्या लहान भावाने बँकिंगचा लॉगिन पासवर्ड चोरुन बँकेतील पैशे काढून घेऊन अपहार केला आहे. याप्रकरणी मयताच्या पत्नी कौशल्या सुनिल कुमार (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अनिल कुमार (वय ३०) दोघेही सध्या रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, २३ मार्च रोजी थेऊर फाटा (ता. हवेली) येथे लक्ष्य लॉजिस्टीक नावाने ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारे सुनिल कुमार (वय ३१) हे मयत झाले आहेत. त्यानंतर हरियाणा राज्यात ट्रान्सपोर्ट व्यावसाय करणारा त्यांचा लहान भाऊ अनिल कुमार हा थेऊर फाटा येथे आला त्याने आपल्या वहिनी कौशल्या यांचे संमतीशिवाय त्यांच्या पतीचा बँकेशी सलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन ऑनलाईन बँकिंगच्या लॉगिन पासवर्ड चोरुन मयताच्या खात्यावरुन त्यांचे लक्ष्य लॉजिस्टीक नावाने १३ एप्रिल रोजी १५ लाख २३ हजार ६४६ रुपये ट्रान्सफर केले.
त्यानंतर फिर्यादी कौशल्या यांचा विश्वास संपादन करून त्यांचा मोबाईल घेवुन त्यांच्या संमती शिवाय दिशाभुल करत तब्बल ३ लाख रुपये ट्रान्सफर करुन घेतले. याबरोबरच त्यांच्या पायींच्या नावावर असलेले सिम कार्ड त्यांच्या नावावर करून घेतले. त्या मोबाईल नंबरचा वापर करून त्यांच्या पतीचे मार्केटमध्ये असलेली रक्कम त्या नंबरचा वापर करून वळवून घेत आहेत. त्याप्रमाणेच लक्ष्य लॉजिस्टीक ट्रान्सपोर्टच्या नावाच्या पावत्या वापरुन ग्राहकांची फसवणुक करत आहे.
दरम्यान, अनिल कुमार यांच्याविरोधात १८ लाख २३ हजार ६४६ रुपयांचा अपहार करून आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करत आहेत.