वैजापूर : वैजापूर-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील शनिवारी रात्री झालेल्या अपघातात १६ जण गंभीर जखमी झाले आहेत.शनी शिंगणापूर येथून दर्शन करून नाशिककडे जाताना हा अपघात झाला.शनिवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास वैजापूर-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव पाटीजवळ ही घटना घडली.
पिकअप आणि टेम्पोचा यांच्यात झालेल्या अपघातात १६ जण गंभीर जखमी झाली. जखमींमध्ये राजश्री फोगुला, अखिलेश कोमिनेनी, मुकेश कोमिनेनी, मनोज शेवाळे, यमलक्ष्मी निष्टय्या, चंद्रकला फोगुला, रचकोंडा उदयकुमार, मेरमाला महादेव, कोमिनेनी व्यकन्ना केमालेय्यार, केमालेश्वरी के व्यक्यन्ना कोमेनेन, सायक्ष्मी, रघुपती फोगुला आदींचा समावेश आहे.
मिर्ची घेऊन जाणाऱ्या पिकअपची टूरिस्ट टेम्पो ट्रॅव्हल्सला धडक बसली. या अपघातात सुमारे १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पाच रुग्णवाहिकांतून वैजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात व आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने जेसीबीने बाजूला करण्यात आली. या घटनेनंतर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.