मुंबई : देशात महिलांविरोधी अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशातच आणखी एक हद्यद्रावक घटना समोर आली आहे. मुंबईतील वाकोला येथे एका नराधमाने 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलीची आधी सोशल मीडियावरुन मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढल्यानंतर बोलणे सुरु झाले. यानंतर आरोपीने मुलीला आमिष दाखवून अंधेरी येथे घेऊन गेले आणि तिथे जाऊन त्या पिडित मुलीवर बलात्कार केला.
आरोपीने 15 ऑगस्टच्या दिवशी पिडीत मुलीला त्याचे गाव दाखवण्यासाठी गुजरातमध्ये घेऊन गेला. आणि तिथे जाऊन तिच्यावर आणखी तीन वेळा बलात्कार केल्याचे तक्रारीत सांगितले आहे. त्या दिवशी बराच वेळ होऊन गेला तरीही पीडित मुलगी घरी आली नसल्यामुळे घरच्यांनी त्या मुलीची विचारपूस केली असता मुलीने हा प्रकार उघडकीस आणला. हे प्रकार ऐकताच कुटुंबाना धक्काच बसला. आरोपीची ओळख पटवण्यासाठी पीडितेने इंस्टाग्रामवरुन त्याचा फोटो तिच्या कुटुंबीयांना दाखवला. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी तात्काळ कपूर रुग्णालयात नेण्यात आले असून वैद्यकीय तपासणी अहवालाचा समावेश आरोपपत्रात करण्यात येणार आहे.
आरोपी मुलाची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांनी पीडितेला जवळच्या वाकोला पोलीस ठाण्यात नेले आणि पोलीसांना घटनेची माहिती दिली. त्यांनी अपहरण आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलीसांनी गोरेगाव येथील एका हॉटेलमध्ये संशयिताचा माग काढला आणि आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम 4,8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.